दुबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्पात पोहोचली असून अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा संपण्याआधीच चौदाव्या हंगामाची उत्सुकता पाहायला मिळत आहेत. पण, बीसीसीआयला आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या तयारीसाठी वेळ मिळाला नाही. यामुळे स्पर्धेच्या आयोजनाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हे सामने कुठे खेळवले जाणार यांची माहिती दिली आहे.
एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना सौरव गांगुली यांनी सांगितलं की, पुढील वर्षी म्हणजे २०२१ सालच्या एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन केले जाणार आहे. हा हंगाम परदेशात नाही तर भारतातच खेळवला जाणार असल्याचेही गांगुली यांनी स्पष्ट केलं. आयपीएलच्या पुढील हंगामाबाबत करण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी याबाबत माहिती दिली.
तेराव्या हंगामाबाबत काय म्हणाले गांगुली -
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलच्या तेराव्या हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. यावर गांगुली यांनी सांगितले की, आयपीएलच्या आयोजनात अनेक समस्या आल्या असल्या तरी स्पर्धा रंगतदार होत आहे. यात चांगला खेळ खेळला गेला. आम्ही अन्य टी-२० लीगचाही सन्मान करतो. आयपीएल स्पर्धा यशस्वी होण्यामागे प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याशिवाय हे अशक्यच होते.
हेही वाचा - IPL २०२० : बुमराह जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज; इंग्लंडच्या 'या' दिग्गजाकडून कौतुक
हेही वाचा - IPL २०२० : विराटला झालयं तरी काय, पुन्हा केली स्लेजिंग; पांडेने दिले 'असे' उत्तर, पाहा व्हिडिओ