नवी दिल्ली - सौरव गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये नवीन बदल पाहायला मिळत आहेत. गांगुलींच्या प्रयत्नाने भारतीय संघाने पहिला प्रकाशझोतातील कसोटी सामना खेळला. त्यानंतर आता महिला क्रिकेटपटूंच्या आयपीएल स्पर्धेबाबत गांगुली सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे.
गांगुली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले, की 'महिलांसाठी आयपीएल स्पर्धा भरवायची असेल, तर तेवढे खेळाडूंची आवश्यकता असते. येत्या ४ वर्षांच्या काळात हे शक्य होईल. तेव्हा महिलांसाठी ७ संघ सहभागी होतील, अशी आयपीएल स्पर्धा भरवता येईल.'
त्यांनी स्थानिक राज्य संस्थांनी आपल्या अंतर्गत खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंना अजून प्रोत्साहन देण्याची गरज असून ज्यावेळी महिला खेळाडूंची संख्या दीडशेच्या घरात पोहोचेल त्यावेळी ही स्पर्धा भरवणं नक्कीच शक्य होईल, असे सांगितलं.
दरम्यान, मध्यंतरी महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा भरवावी, अशी मागणी चाहत्यांकडून होत होती. २०१९ च्या हंगामात बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंसाठी ३ प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजही केलं होतं. मात्र यानंतर हा विषय मागे पडला होता.
गांगुली सध्या स्थानिक क्रिकेटला बळकटी देण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी त्यांनी विविध योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. तसेच ते महिला आयपीएलबाबतही सकारात्मक असल्याचे दिसते.
हेही वाचा - INDvsWI २nd T-२० : टीम इंडियासमोर मालिका विजयाचे ध्येय
हेही वाचा - ग्रॅमी स्मिथ होणार दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा संचालक