मोहाली - युवा क्रिकेटपटू शुबमन गिल रणजी करंडकातील एका वादामुळे चर्चेत आला आहे. मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमवर दिल्ली विरुद्ध पंजाब यांच्यातील सामन्यात पंजाबचा फलंदाज शुभमनने पंचांना अपशब्द वापरले. पंचांनी गिलला बाद दिले होते, मात्र, त्याच्या वागण्यानंतर पंचांनीही आपला निर्णय बदलला. या घटनेमुळे दिल्लीचा संघही काही काळ नाराज होता.
हेही वाचा - तब्बल २२ वर्षानंतर ठाण्यात रंगणार रणजी सामना!
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकाराने ट्विटरवरुन या वादाबद्दल ट्विट केले. 'शुबमन पंचांच्या निर्णयावर खुश नव्हता, म्हणून त्याने मैदान सोडले नाही. त्यानंतर या सामन्यात पदार्पण करणारे पंच पश्चिम पाठक यांच्याजवळ जाऊन शुबमनने वाद घातला आणि अपशब्दही वापरले. त्यानंतर पंचांनी आपला निर्णय बदलला, असे पत्रकाराने या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या प्रकारामुळे सामनाही काही काळ थांबवण्यात आला. मॅच रेफरीने याप्रकरणी दखल घेतल्यानंतर, सामना पुन्हा सुरू झाला. २० वर्षीय शुबमनला अखेर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. त्याने ४१ चेंडूत २३ धावा केल्या. सिमरनजित सिंगने त्याला माघारी धाडले.