लाहोर - 1999 च्या कारगिल युद्धात भाग घेण्यासाठी काऊंटी क्रिकेट क्लब नॉटिंघमशायरचा 1,75,000 पौंडचा करार धुडकावल्याचा दावा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केला आहे. कारगिल युद्ध 16,000 फूट उंचावर लढले गेले, ज्यामध्ये 1042 पाकिस्तानी सैनिक ठार झाले तर, 527 भारतीय सैनिक शहीद झाले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अख्तर म्हणाला, "ही कहाणी फार क्वचित लोकांना माहित आहे. मला नॉटिंघमशायरकडून 1,75,000 पौंड कराराची ऑफर होती. त्यानंतर 2002 साठी माझ्याकडे आणखी एक मोठा करार होता. जेव्हा कारगिल झाले तेव्हा दोन्ही ऑफर मी नाकारल्या."
तो म्हणाला, "मी लाहोरच्या बाहेरील सीमेवर होतो. एका जनरलने मला विचारले, की मी येथे काय करत आहे. मी म्हणालो, की युद्ध सुरु होणार आहे आणि आपण एकत्र मरणार. मी दोन वेळा काऊंटी क्रिकेट सोडले. मला काही चिंता नव्हती. मी काश्मिरमधील माझ्या मित्रांना फोन केला आणि म्हटले, की मी लढायला तयार आहे."
खेळ आणि राजकारण वेगळे ठेवले पाहिजे, असे अख्तरने वारंवार म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये मैदानावर निश्चितच कठोर स्पर्धा आहे, परंतु मैदानाबाहेर खेळाडू चांगले मित्र राहिले आहेत, असेही अख्तरने सांगितले.