हैदराबाद - भारतीय संघाचा डावखुरा सलामीवर शिखर धवन खांद्याच्या दुखापतीमुळे आगामी संपूर्ण न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात, क्षेत्ररक्षण करताना शिखरच्या खांद्याला दुखापत झाली. यामुळे तो त्या सामन्यात फलंदाजी करु शकला नव्हता. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, शिखरची दुखापत गंभीर असून तो आयपीएल स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तो आयपीएलला मुकल्यास, दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आयपीएल २०२० चे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. पण आयपीएलचा १३ वा हंगाम २९ मार्च ते १ एप्रिल यादरम्यान रंगण्याची शक्यता आहे. जर नियोजित वेळापत्रकानुसार स्पर्धा सुरू झाली, तर शिखर धवनला या स्पर्धेच्या सुरूवातीच्या सामन्यांना मुकावे लागण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिखरला दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी किमान १० आठवड्याचा कालावधी लागणार आहे. यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांना त्याला मुकावे लागणार असल्याची शक्यता आहे. शिखर बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचारासाठी दाखल होणार आहे.
बीसीसीआयनं शिखरच्या दुखापतीबाबत सांगितले, की 'शिखरच्या खांद्याचा एमआरआय काढण्यात आला आणि त्याची ही दुखापत ग्रेड दोनची असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याला विश्रांतीला सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. टी-२० मालिकेसाठी शिखरच्या जागेवर संजू सॅमसनला संधी मिळाली आहे. तर एकदिवसीय सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉने गब्बरची जागा घेतली आहे.
हेही वाचा - VIDEO : विकेट वाचवण्यासाठी घेतली बॉलरच्या डोक्यावरून उडी, आदळला अन्...
हेही वाचा - BCCI खेळाडूंच्या दुखापतीमुळे धस्तावली, साहाला रणजी खेळण्यापासून रोखलं