पुणे - भारतीय संघाने नववर्षाची सुरूवात मालिका विजयाने केली. श्रीलंकेविरुध्दच्या ३ टी-२० सामन्यात भारतीय संघाने २-० ने बाजी मारली. दरम्यान, तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात, संजू सॅमसनच्या रुपाने बदल पाहायला मिळाला. सॅमसनला ऋषभ पंतच्या ठिकाणी संघात स्थान देण्यात आले होते. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयाबाबत शिखर धवनने भूमिका स्पष्ट केली आहे.
सॅमसनच्या निवडीबाबत धवनने सांगितले, की 'संघ व्यवस्थापनाला सद्या वेगवेगळ्या खेळाडूंना संधी द्यायची आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात सॅमसनला संधी मिळाली. सगळ्यां फलंदाजांना समान संधी मिळावी यासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे. कारण टी-२० विश्वचषक स्पर्धेआधी भारताकडे फार कमी टी-२० सामने शिल्लक आहेत.'
विश्वचषक स्पर्धा २०२० पर्यंत प्रत्येक खेळाडूला त्याची जबाबदारी आणि भूमिका समजण्यासाठी संघात खेळाडूंना आलटून पालटून संधी देण्यात येत आहे. त्याचा मूळ स्पर्धेत आम्हाला खूप उपयोग होईल, असेही धवनने सांगितले. दरम्यान, तिसऱ्या सामन्यात संधी मिळून देखील सॅमसनला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तो ६ धावांवर बाद झाला.
भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. १४ जानेवारीपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.
हेही वाचा - ICC T-20 Ranking : विराटची क्रमवारीत सुधारणा, तर रोहित टॉप-१० मधून बाहेर
हेही वाचा - ६व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, आणि फक्त १ धाव काढून मोठ्या विक्रमाचा मानकरी झाला!