साऊदॅम्प्टन - अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भारताने अफगानिस्तावर ११ धावांनी विजय मिळवला. या लढतीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने हॅट्ट्रिक केली. ही या विश्वषकातील पहिलीच हॅट्रीक आहे. शमीने एका फलंदाजाला झेलबाद आणि दोन फलंदाजांचा त्रिफळा उडवत हॅट्ट्रिक साधली. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शमीने या हॅट्ट्रिकची पूर्वकल्पना धोनीने दिली असल्याचे सांगितले आहे.
शमी म्हणाला, "धोनीने यॉर्कर टाकण्याबद्दल मला सांगितले होते. मीसुद्धा यॉर्करचाच विचार केला होता. तुला हॅट्ट्रिकची संधी आहे. त्यामुळे काही बदल करु नकोस. असे धोनी बोलला होता." शेवटच्या षटकात अफगाणिस्तानला १६ धावा पाहिजे होत्या, तेव्हा गोलंदाजीस आलेल्या शमीला धोनीने सल्ला दिला होता.
यापूर्वी १९८७ च्या विश्वषचकात भारताच्या चेतन शर्माने पहिली हॅट्ट्रिक केली होती. त्यानंतर विश्वषचकात हॅट्ट्रिक करणारा शमी हा भारताचा दुसरा गोलंदाज आहे. क्रिकेट विश्वचषकामध्ये हॅट्ट्रिक नोंदवणारा शमी हा दहावा गोलदांज आहे. या विश्वषकात भारताचा हा सलग ४ था विजय आहे. आता भारताचे ९ गुण झाले असून, गुणतालिकेत भारत तिसऱ्या क्रमाकांवर आहे.