नवी दिल्ली - हैदर अली, हारीस रौफ आणि शादाब खान हे तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, पाकिस्तानच्या आणखी सात खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज मंगळवारी याची पुष्टी केली. पाकिस्तान संघ जून महिन्याच्या अखेरीस इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.
फखर जमान, इम्रान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनन, मोहम्मद रिजवान आणि वहाब रियाज या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. पीसीबीचे वैद्यकीय पथक या खेळाडूंच्या संपर्कात आहे. त्यांना स्वत:च्या आणि त्यांच्या कुटूंबाच्या आरोग्यासाठी स्व-विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे, असे पीसीबीने सांगितले.
इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तान 3 कसोटी आणि 3 टी-20 सामने खेळणार आहेत. यासाठी अनेक खेळाडू वेगवेगळ्या शहरांमध्ये सराव करत आहेत. लाहोर येथून 24 जूनला सर्व जण एकत्र येणार आहेत. त्यानतंर संघ मॅंचेस्टरला (इंग्लंड) रवाना होईल. काही दिवसांपूर्वीच इंग्लंड दौऱ्यासाठी 29 सदस्यांचा संघ निवडण्यात आला होता.
याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.