मँचेस्टर - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर कर्णधार कोहलीने घेतलेल्या निर्णयावर दिग्गज खेळाडूंकडून कडाडून टीका होत आहे. भारताचे पहिले तीन फलंदाज ५ धावांवर बाद झाले होते. तेव्हा चौथ्या क्रमांकावर धोनीला फलंदाजीसाठी पाठवायला हवे होते. अशी प्रतिक्रिया भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी दिली. जर धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला असता तर सामन्याचा निकाल वेगळा असता असे त्यांनी म्हटले आहे.
कर्णधार कोहलीने धोनीला चौथ्या क्रमांकावरच फलंदाजीला पाठवायला हवे होते. याचे कारण २०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाची अवस्था अशीच खराब होती. तेव्हा कर्णधार धोनी होता. त्याने स्वतः मैदानात उतरत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे आजही धोनीला चौथ्या क्रमांकावरच फलंदाजीला पाठवायला हवे होते. असे गांगुली म्हणाला.
धोनी हा अनुभवी फलंदाज असून तो दडपणात चांगला खेळ करतो. भारतीय संघाचे पहिले तीन गडी बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर धोनीलाच पाठवायला हवे होते. धोनीने दबाव कमी केला असता आणि त्यानंतर हार्दिक पांडया, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा आणि दिनेश कार्तिक हे मोठे फटके खेळू शकले असते. अशी प्रतिक्रिया व्हीव्हीएस लक्ष्मणने दिली.
दरम्यान, न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर भारताचे स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे. या पराभवाबरोबर भारतीय संघाचे विश्वकरंडकाचे स्पप्न भंगले आहे.