लंडन - भारत विरुध्द झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान संघात वाद उफाळून आला आहे. पाकिस्तान ड्रेसिंग रुममधील वातावरण तापले असल्याचे एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीने सांगितले आहे. भारताकडून झालेल्या पराभवानंतर कर्णधार सर्फराज अहमद आपल्या सहकारी खेळाडूंवर भडकला असल्याची सुत्राची माहिती आहे. तसेच एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, इमाद वसीम, इमाम उल हक याच्यासह संघातील काही खेळाडूंवर ग्रुप बनवून आपल्या विरोधात कटकारस्थान रचत असल्याचा गंभीर आरोप सर्फराज याने केला आहे.
भारताविरुध्द झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान संघाच्या चाहत्यांनी आपल्याच खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोल केले. काहींनी तर ड्रेसिंग रुममध्ये जात असताना खेळाडूंना शिवीगाळ केली. पूर्व कर्णधार वसीम आक्रम यानेही भारताविरुध्दच्या सामन्यात गुडघे टेकल्याने आपल्या खेळाडूंचा चांगलाचा समाचार घेतला आहे. वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने तर कर्णधार सर्फराजला 'बिनडोक' म्हणत टीका केली. या सगळ्या घटनांनी त्रस्त असलेल्या पाकिस्तान संघात दुफळी निर्माण झाली आहे. सुत्रानुसार पाकिस्तान संघात दोन गट पडले असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, एका रिपोर्टनुसार भारताविरुध्दचा पराभव हा 'गटतट'मुळे झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. एकीकडे पाकिस्तान संघाच्या अडचणीत वाढ झालेली असताना दुसरीकडे वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने खेळाडूंच्या पाठिशी राहण्याचे आवाहन केले आहे.