नवी दिल्ली - भारताचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीने १५ ऑगस्टच्या सायंकाळी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. त्याच्या निवृत्तीच्या पोस्टनंतर, सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेक धोनीप्रेमी चाहते भावनिक झाले. तर, काहींना हा धक्का पचवणे कठीण गेले. धोनीच्या निवृत्तीवर त्याची पत्नी साक्षीनेही भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
''तू जे काही मिळवले आहेस, त्याचा तुला अभिमान असला पाहिजे. क्रिकेटमध्ये आपले सर्वस्व आणि सर्वोत्तम दिल्याबद्दल तुझे अभिनंदन. तू मिळवलेल्या यशाबद्दल आणि तुझ्याबद्दल मला गर्व आहे. मला माहित आहे, की तुझ्यासाठी सर्वकाही असणाऱ्या क्रिकेटला निरोप देताना तू डोळ्यातून अश्रूंना थांबवले असशील. भविष्यातील तुझ्या वाटचालीसाठी शुभेच्छा'', असे साक्षीने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
याव्यतिरिक्त साक्षीने अमेरिकेतील कवी माया एंजेलोचे एक वाक्य धोनीसाठी पोस्टमध्ये लिहिले आहे. तिने लिहिले, ''तू काय म्हणालास हे लोक विसरतील, तू काय केलेस हे लोक विसरतील, पण तू करून दिलेली जाणीव लोक विसरणार नाहीत.''
२०१९च्या विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीनंतर धोनीने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नव्हता. आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या तयारीसाठी धोनी चेन्नईतील शिबिरात दाखल झाला. तेथे त्याने आणि डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने निवृत्तीची घोषणा केली.