मुंबई - आयपीएलमध्ये सलग दुसरे अर्धशतक झळकावत चेन्नईला विजय मिळवून देणाऱ्या ऋतुराज गायकवाडचे चहुबाजूने कौतुक केले जात आहे. गुरुवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाताने चेन्नईविरुद्ध १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. ऋतुराजने ५३ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७२ धावा फटकावून संघाला विजय मिळवून दिला.
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ऋतुराज गायकवाड एक प्रतिभावान खेळाडू असल्याचे म्हटले. तर भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने सामना सुरू होण्यापूर्वीच गायकवाडबद्दल एक भविष्यवाणी केली होती. ऋतुराज दीर्घ खेळीसाठी बनला असल्याचे सचिनने सांगितले होते.
चेन्नई-कोलकाता सामन्यापूर्वी यूट्यूबवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये सचिन म्हणाला, "मी त्याचा फारसा खेळ पाहिला नाही. परंतू तो एक शानदार फलंदाज आहे. त्याने खूप चांगले फटके खेळले आहेत. जेव्हा एखादा फलंदाज योग्य फटके खेळण्यास सुरुवात करतो, कव्हर किंवा मिड विकेट किंवा थेट गोलंदाजाच्या डोक्यावरुन खेळत असतो, तेव्हा हे समजले जाते की हा फलंदाज दीर्घ खेळीसाठी बनला आहे."
"मला वाटते, की आजच्या सामन्यात तो पुन्हा डावाची सुरुवात करेल कारण त्याचे तंत्र आणि मानसिकता आश्चर्यकारक आहे. धोनी नक्कीच त्याच्यावर विश्वास ठेवेल", असे सचिनने सामन्यापूर्वी म्हटले होते.