उस्मानाबाद - जिल्हा कार्यालयापासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा हे गाव भारतरत्न सचिन तेंडुलकर याने दत्तक घेतले होते. १५ ऑगस्ट २०१६ रोजी त्याची अधिकृत घोषणाही झाली होती. क्रिकेटच्या देवाने दुष्काळी पट्ट्यात असलेले डोंजा हे गाव दत्तक घेतल्याने गावकऱ्यांना आशेची किरणे दिसू लागली आहेत. या दत्तक प्रक्रियेला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.
गावात झालेली कामे पाहून गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सचिनने गाव दत्तक घेतल्यापासून रस्त्यावर वाहणारे गटाराचे सांडपाणी बंद झाले. गावात अंडरग्राउंड गटारीची कामे सुरू आहेत. त्यापैकी ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.
गावात चार आरओ प्लांट लावण्यात आले आहेत. त्यामुळे, लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे. या आरओ प्लांट मधून गावकऱ्यांना पाच रुपयाला १५ लिटर पाणी मिळते. सांडपाण्यासाठी घरोघरी नळाची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण गावात दोन कोटी १८ लाख रुपये खर्च करून अंतर्गत सिमेंट रस्त्याची कामेही पूर्ण झाली आहेत.
गावातील विद्यार्थ्यांसाठी ९६ लाख रुपये खर्च करून शाळेची इमारत बांधून देण्यात आली आहे. या शाळेसाठी लागणारी विजेची व्यवस्था सौरऊर्जेच्या माध्यमातून उभी करण्यात आली आहे. डोंजा हे गाव तीन जिल्ह्याच्या सीमावर्ती वसलेले असून या गावाला तीन नद्यांचा संगम आहे. मात्र तरीही गावचा विकास खुंटला होता.
परंतू, सचिनने गाव दत्तक घेतले आणि या गावाचा कायापालट झाला, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. क्रिकेटच्या देवाने हे गाव दत्तक घेतल्याने प्रशासनानेही दखल घेत प्रधानमंत्री आवास योजनेतून ६५ घरांपैकी ५६ घरे मंजूर करून दिली आहेत. रमाई आवास योजनेतून दहा घरांची उभारणी झाली आहे. याबरोबरच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनुदान देऊन संपूर्ण गावात शौचालये उभी करण्यात आली आहेत. ज्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानावर सचिन एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जात होता. त्याचप्रमाणे, सचिन उत्तम नागरिक म्हणूनही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत आहे.