नवी दिल्ली - ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना केंद्र सरकारने अखिल भारतीय क्रीडा परिषदेमधून (एआयसीएस) वगळले आहे. डिसेंबर २०१५ मध्ये या परिषदेची स्थापना झाली होती. देशातील खेळाच्या विकासाशी संबंधित विषयांवर केंद्र सरकारला सल्ला देण्यासाठी या समितीची निर्मिती झाली होती.
हेही वाचा - अवघ्या ४१ धावांत भारताने उडवला प्रतिस्पर्धी संघाचा खुर्दा!
भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि के. श्रीकांत यांना नवीन सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. तत्कालीन क्रीडा मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी डिसेंबर २०१५ या समितीची स्थापना मध्ये केली होती. डिसेंबर ते मे २०१९ या कालावधीत परिषदेच्या पहिल्या कार्यकाळात सचिन तेंडुलकर यांना राज्यसभा खासदार आणि आनंदला खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले होते. आता परिषदेत सदस्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे.
आता ही समिती २७ ऐवजी १८ सदस्यांची करण्यात आली आहे. सचिन आणि आनंद व्यतिरिक्त बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि माजी फुटबॉल कर्णधार बायचंग भूतिया यांनादेखील वगळण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि आनंद परिषदेच्या सभांमध्ये पोहोचू न शकल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
व्यस्त वेळापत्रकामुळे गोपीचंद यांना परिषदेतून हटवण्यात आल्याचे कारण दिले गेले आहे. या समितीत आर्चर्स लिंबा राम, पीटी उषा, बचेंद्री पाल, दीपा मिलाक, नेमबाज अंजली भागवत, रेडेनी सिंग आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांना नवीन सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.