नवी दिल्ली - भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने बंगळुरूस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) आपली फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्यामुळे तो आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यास सज्ज झाला आहे. १३ तारखेला रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल, अशी शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात रोहित १४ दिवसांच्या विलगीकरणात राहील.
हेही वाचा - भारताच्या 'जलदगती'समोर कांगारूंची भंबेरी; पहिल्या डावात ८६ धावांची आघाडी
या संदर्भात मात्र बीसीसीआयने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जाहीर केलेले नाही. आयपीएलदरम्यान मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे रोहितला काही साखळी सामन्यांना मुकावे लागले. त्यामुळेच रोहितची ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली नाही.
चार्टर विमानाने घेणार उड्डाण -
३२ वर्षीय रोहित मुंबईहून दुबईसाठी चार्टर विमानाने उड्डाण घेणार आहे आणि तेथून तो १३ डिसेंबरला सिडनीला रवाना होईल. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये तो संघात निवडीसाठी उपलब्ध असेल. १७ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली मायदेशी परतणार आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मावर आणि पुजारावर भारतीय संघाच्या फलंदाजी मदार असेल. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे.