राजकोट - भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोटमध्ये दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. या सामन्यात 'हिटमॅन' रोहित शर्माने एक नवा विक्रम रचला. त्याने सलामीवीर फलंदाज म्हणून या विक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि आफ्रिकेच्या हाशिम अमलाला मागे टाकले.
हेही वाचा - रणजीत 'त्रिशतक' ठोकलेल्या क्रिकेटपटूनं पंतला केलं 'रिप्लेस'
रोहित शर्मा शुक्रवारी ७ हजार एकदिवसीय धावा करणारा वेगवान सलामीवीर फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाबरोबरच्या एकदिवसीय सामन्यात रोहितने ४२ धावा करत हा विक्रम प्रस्थापित केला. रोहितने १३७व्या डावात सलामीवीर म्हणून ७ हजार धावा पूर्ण केल्या. हा पराक्रम करण्यासाठी अमलाने १४७ डाव खेळले होते. तर सचिन तेंडुलकरने १६० डावात ही कामगिरी केली होती.
या सामन्यात प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाच्या सलामीवीरांनी ८१ धावांची दमदार सलामी दिली. रोहित शर्मा ४२ धावांवर बाद झाला. फिरकीपटू अॅडम झम्पाने त्याला पायचित पकडले. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार लगावले.