नवी दिल्ली - आफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्रथमच सलामीची संधी मिळालेल्या रोहित शर्माने दोनही डावात शतके झळकावली. त्याच्या या कामगिरीवर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर भलताच खूष झाला आहे. त्याने रोहितला माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागपेक्षा वरचढ ठरवले आहे.
हेही वाचा - पाकिस्तानला लंकेने पाजले पाणी, पहिल्यांदा जिंकली टी-२० मालिका
'सेहवागपेक्षा रोहित शर्माकडे उत्तम शैली आहे. सेहवाग नेहमी आक्रमक असायचा मात्र, रोहित वेगळा आहे. त्याच्याकडे अचूक टायमिंग असून तो विवध फटके खेळू शकतो. मी त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला वाटले की हा खेळाडू भारताचा इंजमाम-उल-हक होऊ शकतो. कसोटीत खेळण्यासाठी त्याला आवड नव्हती मात्र, त्याचा विचार आता बदलला आहे', असे अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे.
या सामन्यात रोहितने दोन शतकासह ३०३ धावा केल्या. रोहितला या दमदार कामगिरीमुळे सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. शिवाय, तो आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. रोहित या सामन्यापूर्वी क्रमवारीत ३७ स्थानावर होता. आता तो भरारी घेत १७ व्या स्थानी पोहोचला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला पहिल्यांदाच खेळताना आफ्रिकेविरुध्द दोनही डावात शतक ठोकणारा रोहित पहिला फलंदाज ठरला. तसेच, त्याने भारताकडून एकाच सामन्याच्या दोनही डावात शतके झळकावणाऱ्यांच्या यादीतही स्थान मिळवले. भारताचे दिग्गज फलंदाज सुनिल गावसकर यांनी तीन वेळा, राहुल द्रविडने दोन वेळा तर विजय हजारे, अजिंक्य रहाणे, विराट कोहली यांनी एकदा, दोनही डावात शतक लगावण्याचा पराक्रम केला आहे. यात आता रोहितचे नाव दाखल झाले आहे.