रायपूर - रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लिजेड्सने अंतिम फेरी गाठली आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात इंडिया लिजेंड्सने वेस्ट इंडीज लिजेड्सचा १२ धावांनी पराभव केला. इंडिया लिजेड्सच्या सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंह या दोघांनी तुफानी फटकेबाजी केली. त्यानंतर गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर इंडिया लिजेड्सने हा सामना जिंकला.
रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात इंडिया लिजेड्सने नाणेफेक गमावली. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा प्रथम फलंदाजी करताना इंडिया लिजेड्सने ३ बाद २१९ धावांचे विशाल लक्ष्य उभारले. कर्णधार सचिन तेंडुलकर (६५) आणि युवराज सिंह (नाबाद ४९ धावा) यांनी तुफानी फटकेबाजी केली.
इंडिया लिजेड्सने दिलेल्या २१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची सुरूवात खराब झाली. विल्यम पर्किन्स फक्त ९ धावा काढून बाद झाला. त्यानंतर ड्वेन स्मिथने (६३) फटकेबाजी करत विंडिजची धावसंख्या १०० पार पोहोचवली. स्मिथने नरसिंह डोनरेन (५९) याच्यासोबत ९९ धावांची भागीदारी केली आणि विंडिजला विजयाजवळ नेण्याचा प्रयत्न केला. पण धोकादायक ठरु पाहणारी ही जोडी इरफान पठाणने तोडली. त्याने स्मिथला युसूफ पठाणच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.
स्मिथ बाद झाल्यावर प्रज्ञान ओझाने पुढच्याच षटकात किर्क एडवडर्सला खातंही न खोलू देता तंबूत पाठवले. १२० धावांवर तीन गडी गमावल्यानंतर कर्णधार ब्रायन लारा मैदानात आला. लारा आणि डोनरेनने चौथ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करत विंडीजच्या विजयाची आशा कायम ठेवल्या. पण अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज असताना वेस्ट इंडिज लिजेंड्सचा संघ २०६ धावाच बनवू शकला. आता अंतिम सामन्यात इंडिया लिजेड्सचा सामना श्रीलंका लिजेड्स आणि दक्षिण आफ्रिका लिजेड्स यांच्यातील विजेत्या संघासोबत होईल. दुसरा उपांत्य सामना शुक्रवारी होणार आहे, तर रविवारी अंतिम सामना होईल.
हेही वाचा - IND VS ENG ४th T२० : भारताला विजय अनिवार्य, इंग्लंडला मालिका विजयाची संधी
हेही वाचा - IPL संपेपर्यंत सर्व घरगुती स्पर्धा स्थगित; 'या' कारणाने BCCI चा मोठा निर्णय