मुंबई - सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारासारख्या दिग्गज खेळाडूंची उपस्थिती असलेली रोड सेफ्टी विश्व सिरीज महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आली आहे. पीटीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेळाडू आणि लोकांच्या सुरक्षेसाठी ही मालिका रद्द करण्यात आली आहे.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेतील उर्वरित सामने प्रेक्षकांशिवाय
वाहतुकीच्या नियमांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने रोड सेफ्टी विश्व सिरीजचे आयोजन करण्यात आले होते. या मालिकेचे उर्वरित सामने रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय होणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता या मालिकेला पूर्णविराम देण्यात आला आहे. ११ सामन्यांच्या या मालिकेचे चार सामने खेळले गेले आहेत.
कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. चीनमधून जगभरात फैलाव झालेल्या या विषाणूमुळे ४ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगातील १०० हून अधिक देशात याचा प्रसाह झाला आहे. भारतात ७० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. या विषाणूचा धोका लक्षात घेता बीसीसीआय प्रेक्षकांविना सामना खेळवण्याच्या विचारात आहे.
कोरोनामुळे चीनमधील सर्व स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच चीनी खेळाडूंना भारतासह अनेक देशांनी स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखले आहे. जुलै महिन्यात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धाही कोरोनामुळे संकटात सापडलेली आहे. तर आयपीएलवरही टांगती तलवार आहे.