गयाना - वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-० ने विजय मिळवला. पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या ऋषभ पंतने तिसऱ्या सामन्यात मात्र दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात पंतने ४ चौकार ४ षटकाराच्या मदतीने ४२ चेंडूत ६५ धावा केल्या आणि सोबतच जे धोनीला जमले नाही, ते त्याने या सामन्यात करुन दाखवले.
मंगळवारी झालेल्या सामन्यापर्यंत कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाला ६० धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. भारतीय यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक धावा धोनीच्या नावावर होत्या. धोनीने २०१७ मध्ये याआधी इंग्लंडविरुद्ध ५६ धावांची खेळी केली होती. आता हा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर झाला आहे.
मंगळवारी झालेल्या सामन्यात, विडिंजचे १४७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन अवघ्या ३ धावांवर बाद झाला. त्यानंतर काही वेळातच लोकेश राहुल १८ धावा करुन परतला. त्यानंतर मात्र कर्णधार विराट कोहली (५९ धावा) आणि ऋषभ पंत या दोघांनी १०६ धावांची भागिदारी करत भारताला विजयाजवळ नेले.