मुंबई - इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वकरंडकापूर्वी भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू विजय शंकर नेटमध्ये सराव करताना जखमी झाला होता. यामुळे भारतीय संघाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र विश्वकरंडकापूर्वी विजय शंकरला तंदुरुस्त घोषित करण्यात आल्याने भारतीय क्रिकेट संघाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
न्यूझीलंडविरूद्धच्या सराव सामन्यापूर्वी सराव करताना खलील अहमदने फेकलेला एक चेंडू शंकरच्या डाव्या हाताला लागल्याने तो दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर त्याने तातडीने मैदान सोडले होते. त्यामुळे अनेकांना वाटले होते की, शंकरला झालेली दुखापत ही गंभीर आहे. मात्र, आता त्याला फिट घोषित करण्यात आल्याने भारताची चिंता मिटली आहे.
30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेत विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १४ जुलैला लॉर्डसवर खेळण्यात येणार आहे.