सिडनी - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या अंगठ्याची दुखापत गंभीर असून तो मायदेशात होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजीदरम्यान जडेजाला ही दुखापत झाली.
सिडनी कसोटीत मिचेल स्टार्कने फेकलेला वेगवान चेंडू रविंद्र जडेजाच्या डाव्या हातावर आदळला. यात जडेजाचा अंगठा दुखावला गेला. यानंतर त्याच्या हाताचे स्कॅन करण्यात आले. यात अंगठा फॅक्चर असल्याचे दिसून आले. यामुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही.
जडेजाच्या दुखापतीविषयी बीसीसीआयकडून सांगण्यात आले की, 'जडेजाला या दुखापतीतून सावरण्यासाठी ४ ते ६ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळू शकणार नाही.'
दरम्यान, इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ मायदेशात चार कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. उभय संघातील या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे सुरुवात होत आहे.
भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. दौऱ्याला सुरूवात होण्याआधीच इशांत शर्मा आणि रोहित शर्मा आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झाले. यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद शमी, केएल राहुल त्यानंतर आता रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला आहे.
हेही वाचा - Ind vs Aus : वर्णद्वेषी टीका; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मागितली भारतीय संघाची माफी
हेही वाचा - IND VS AUS : सामना रंगतदार स्थितीत, रहाणे-पुजारा जोडीवर मदार