मुंबई - रेल्वेने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या २०१९-२० च्या हंगामातील पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद केली. रेल्वे दिग्गज मुंबईच्या संघाचा १० गडी राखून पराभव केला. वानखेडेच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात रेल्वेने तीन दिवसात बाजी मारली. पहिल्या डावात शतकी खेळी करणारा कर्ण शर्मा सामनावीर ठरला.
रेल्वेच्या संघाने मुंबईला ११४ धावात गुंडाळत पहिल्याच दिवशी वर्चस्व प्रस्थापित केले. दुसऱ्या डावात मुंबईचा संघ चमत्कार करणार अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. मुंबईचा संघ दुसऱ्या डावात १९८ धावांवर ढेपाळला. दिग्गज अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ आणि कर्णधार सूर्यकुमार यादव सपशेल अपयशी ठरले.
रेल्वेने पहिल्या डावात २६६ धावा करत १५२ धावांची मजबूत आघाडी घेतली. त्यानंतर वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानपुढे (६० धावात ५ बळी) मुंबईचा दुसरा डाव १९८ धावात गडगडला. विजयासाठी ४७ धावांचे तुटपुंजे आव्हान रेल्वेने १२ व्या षटकातच पूर्ण केले. सलामीवीर मृणाल देवधर (नाबाद २७) आणि प्रथम सिंग (नाबाद १९) यांनी रेल्वेला १० गडी राखून विजय मिळवून देत एका बोनस गुणाची भरसुद्धा घातली.
रेल्वेच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. पहिल्या डावात प्रदिपने १०.३ षटकात ३७ धावात ६ गडी टिपले. तर दुसऱ्या डावात सांगवानने २२ षटकात ६० धावा देत ५ गडी बाद केले. दरम्यान, मुंबईचा पुढील सामना ३ जानेवारीपासून वांद्रे-कुर्ला संकुल येथील शरद पवार जिमखाना मैदानावर कर्नाटकविरुद्ध होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
- मुंबई (पहिला डाव) : ११४
- रेल्वे (पहिला डाव) : २६६
- मुंबई (दुसरा डाव) : ६३ षटकांत सर्व बाद १९८ (सूर्यकुमार यादव ६५, आकाश पारकर नाबाद ३५; हिमांशू सांगवान ५/६०)
- रेल्वे (दुसरा डाव) : ११.४ षटकांत बिनबाद ४७ (मृणाल देवधर नाबाद २७)