अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना आहे. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मासाठी हा सामना खास ठरला आहे. इशांतचा हा १०० वा कसोटी सामना आहे. त्यामुळे स्टेडियमचे उद्घाटन करण्यासाठी आलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते इशांतचा गौरव करण्यात आला. भारताकडून १०० कसोटी सामना खेळणारा इशांत ११ वा भारतीय क्रिकेटपटू ठरला. त्याचबरोबर भारताचा कपिल देव यांच्यानंतरचा दुसराच वेगवान गोलंदाज ठरला आहे. आत्तापर्यंत भारताच्या वेगवान गोलंदाजांमध्ये केवळ कपिल देव यांनाच १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळता आले आहेत.
इशांतने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ९९ कसोटी सामन्यात ३०२ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याने ११ वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच १ वेळा सामन्यात १० विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. याशिवाय इशांतने ८० एकदिवसीय सामने खेळताना ११५ विकेट्स आणि १४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळताना ८ विकेट्स घेतल्या आहेत.
हे आहेत भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळलेले क्रिकेटपटू -
- सचिन तेंडुलकर - २००
- राहुल द्रविड - १६३
- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण - १३४
- अनिल कुंबळे - १३२
- कपिल देव - १३१
- सुनील गावसकर - १२५
- दिलीप वेंगसरकर - ११६
- सौरव गांगुली - ११३
- विरेंद्र सेहवाग - १०३
- हरभजन सिंग - १०३
- इशांत शर्मा - १००