लाहोर - पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीज राजा यांनी सध्याच्या कसोटी संघाचा कर्णधार अझर अलीला आगामी इंग्लंड दौऱ्यात आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करून संघाचे नेतृत्व करण्याचा सल्ला दिला आहे. ऐतिहासिक मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ इंग्लंडला पोहोचला. इंग्लंड दौर्यावर पाकिस्तानला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तीन कसोटी तीन टी-20 सामने खेळायचे आहेत.
राजा यांनी गेल्या वर्षी पाकिस्तानने केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आठवण काढली आहे. या दौर्यावर अझरला चार डावांमध्ये केवळ 62 धावा करता आल्या. या मालिकेत पाकिस्तानला 0-2 ने पराभव पत्करावा लागला.
राजा म्हणाले, "अझर अलीने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे, हा माझा पहिला सल्ला असेल. ऑस्ट्रेलियामध्ये त्याचे नेतृत्व चांगले नव्हते. अलीकडच्या काळातही तो चांगल्या फॉर्मात नव्हता. सर्वप्रथम त्याने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे जेणेकरून तो आपल्या सहकाऱ्यांना प्रेरणा देऊ शकेल. तसेच बाबर आझमला ऑस्ट्रेलियामधील फॉर्म कायम राखावा लागेल."
कोरोना काळात क्रिकेट सामने सुरू केल्याबद्दल राजा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) कौतुकही केले. ते म्हणाले, "पहिल्या दिवसापासूनच इंग्लंड दौऱ्याबाबत स्पष्ट मत ठेवल्याबद्दल पीसीबी अभिनंदनास पात्र आहे. क्रिकेट अखेर परतले, ही खरोखर चांगली बातमी आहे."
कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघातील 10 खेळाडू इंग्लंडला जाऊ शकले नाहीत. आता यापैकी सहा खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे हे खेळाडू इंग्लंडला जाण्याच्या तयारीत आहेत.