जयपूर - आयपीएलचे १२ वे सत्र आता अंतिम टप्यात आले असून प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सर्वच संघांमध्ये स्पर्धा लागली आहे. गुणतालिकेतील पहिले ४ संघ हे प्लेऑफमध्ये पोहचतील तर उरलेल्या ४ संघाचे आव्हान संपुष्ठात येणार आहे. त्यामुळे अखेरच्या टप्यात तळाचे संघ जिंकण्यासाठी जीवाचे रान करतील.
आयपीएलमध्ये आज हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात सामना होणार आहे. जो दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असून प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघाना विजय आवश्यक आहे. आजच्या सामन्यात राजस्थानचा पराभव झाल्यास प्लेऑफमध्ये स्थान मिळण्याच्या आशा जवळपास संपुष्टात येणार आहेत. तर हैदराबादचा पराभव झाल्यास प्लेऑफमध्ये पोहचणे त्याच्यांसाठी कठीण होणार आहे. हा सामना आज रात्री ८ वाजता जयपूरच्या सवाई मानसिंह क्रिकेट मैदानावर खेळण्यात येणार आहे.
राजस्थानच्या संघात आता इंग्लंडचे बेन स्टोक्स, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर हे मॅट विनर खेळाडू नाहीत. हे तीन्ही खेळाडू मायदेशी परतले आहेत. तर हैदराबदचा धडाकेबाज सलामीवीर जॉनी बेअरस्टोही घरी परतलाय. त्यामुळे दोन्ही संघाना थोड्याफार प्रमाणात नवी संघ रचना करावी लागणार आहे.
आजच्या लढतीत कांगारु फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर आमने सामने येणार असल्याने क्रिकेट रसिकांना या स्टार खेळाडूंची जुगलबंदी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
राजस्थान रॉयल्स : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अॅश्टन टर्नर, ईश सोधी, ओशेन थॉमस, लिआम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन, शुभम रांजणे, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुदेसन मिधून, जयदेव उनाडकट, प्रशांत चोप्रा, महिपाल लोमरो, आर्यमन बिर्ला, रियान पराग, मनन वोरा, धवल कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, वरुण आरोन, शशांक सिंग, राहुल त्रिपाठी.
सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), मनीष पांडे, मार्टिन गप्टिल, रिकी भुई, डेव्हिड वॉर्नर, दीपक हुडा, मोहमद नबी, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, अभिषेक शर्मा, विजय शंकर, श्रीवत्स गोस्वामी, वृद्धीमान साहा, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, रशीद खान, बॅसिल थम्पी, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम.