मुंबई - कोरोनामुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामावर अनिश्चिततेचे सावट आहे. आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयसह आठ संघांना कोट्यवधींचे नुकसान होऊ शकते. अशात राजस्थान रॉयल्स संघाने यावर तोडगा काढला आहे. या तोडग्यानुसार आयपीएल स्पर्धा होऊ शकते, असे राजस्थान रॉयल्सचे म्हणणे आहे.
राजस्थान रॉयल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रंजित बरठाकूर यांनी बुधवारी सांगितले की, 'कोरोनामुळे यंदाची आयपीएल होणार की नाही याबद्दल शंका आहे. एक गोष्ट केली तर यंदाची आयपीएल खेळवण्यात येऊ शकते. पण त्यामध्ये फक्त भारतीय खेळाडूंचा समावेश करावा आणि सामन्यांची संख्या कमी करावी, असे केल्यास यंदाचे आयपीएल होऊ शकते.'
कोरोनामुळे सध्याच्या घडीला जी परिस्थिती निर्माण झाली ती पाहता, परदेशी खेळाडू येणार की नाही याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे त्यावर फक्त भारतीय खेळाडू आणि सामन्याची संख्या कमी करुन नवा पर्याय काढता येऊ शकतो, असेही बरठाकूर यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे संपूर्ण देश २१ दिवसासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. बीसीसीआयने यामुळे २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित केली आहे. पण आता १५ एप्रिलनंतर देखील ही स्पर्धा होण्याची शक्यता वाटत नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर केंद्र सरकार कोणता निर्णय घेते, यावर आयपीएलचे भवितव्य आहे.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : IPL रद्द होण्याआधीच 'या' संघाला बसला २५ कोटीचा फटका
हेही वाचा - वर्ल्डकप विजेता बटलर करणार जर्सीचा लिलाव, मिळालेला निधी कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी