नवी दिल्ली - न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात सोमवारी होणारा तिसरा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यासह न्यूझीलंडने तीन सामन्यांची मालिका २-० ने खिशात घातली. बे ओव्हल मैदानावर खेळलेला सामना केवळ २.२ षटकांत खेळला गेला, त्यामध्ये वेस्ट इंडिजने एक गडी गमावत २५ धावा केल्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावत सामनाच धुवून टाकला.
हेही वाचा - वॉर्नरची दुखापत आमच्यासाठी चांगली - केएल राहुल
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लॉकी फर्ग्युसनने दुसर्या षटकात ११ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर ब्रेंडन किंगला बाद करून न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. आंद्रे फ्लेचर आणि काइल मायेर्स नाबाद राहिले. त्यांनी अनुक्रमे चार आणि पाच धावा केल्या. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली.
मालिकेत दमदार गोलंदाजी करणाऱ्या लॉकी फर्ग्युसनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यापूर्वीचे दोन्ही टी-२० सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. आता हे दोन्ही संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आमनेसामने असतील. गुरुवारीपासून सेडान पार्क येथे पहिला कसोटी सामना सुरू होईल.