मुंबई - संथ फलंदाजीमुळे मला आजच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकणे अवघड झाले असते, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविडने दिले आहे. द्रविडने आपल्या बचावात्मक शैलीवरही मत दिले. तो म्हणाला, ''बचावात्मक शैलीचे महत्त्व कमी झाले असले तरी ही शैली अस्तित्वात राहणार आहे.''
द्रविड म्हणाला, ''विराट कोहली आणि रोहित शर्मा या फलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेटला नवी दिशा दिली आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारासारख्या फलंदाजाची नेहमीच गरज असेल. मलाही सुरूवातीपासून कसोटी फलंदाज व्हायचे होते. याचा अर्थ असा नाही की मला सेहवागसारखे मोठे फटके खेळायला आवडत नव्हते. माझे कौशल्य वचनबद्धता आणि एकाग्रतेशी संबंधित होते आणि मी त्यावर काम केले.''
द्रविड असेही म्हणाला, ''मी 300 पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळले आहेत, म्हणजे माझी भूमिका केवळ विकेट वाचवण्यापुरती मर्यादित नव्हती. मी ज्या प्रकारे फलंदाजी करत होतो त्याप्रमाणे आज फलंदाजी केली असती तर मी संघात टिकलो नसतो. आजचा स्ट्राइक रेट पहा. एकदिवसीय क्रिकेटमध्ये माझा स्ट्राइक रेट, सचिन तेंडुलकरचा स्ट्राइक रेट किंवा सेहवाग यांच्या फलंदाजीसारखा नव्हता पण त्यावेळी आम्हीही तशाच पद्धतीने क्रिकेट खेळायचो.''
द्रविडने भारताचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराचेही कौतुक केले. तो म्हणाला, ''सौराष्ट्रसारख्या ठिकाणाहून आल्यानंतर लवकरच त्याला कळले की इतर खेळाडूंच्या तुलनेत आपल्याला काहीतरी विशेष करण्याची गरज आहे. त्याने आपला प्रत्येक डाव विशेष करण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाजीत प्रगती केली. त्याच्याकडे बरेच शॉट्स आहेत आणि त्याला ते माहित आहे. तो फिरकी गोलंदाजांसमोर अतुलनीय आहे. पुजाराने त्याच्या खेळावर खूप चांगले काम केले आहे. त्याची एकाग्रता उत्कृष्ट आहे. पुजारासारख्या खेळाडूसाठी संघात नेहमीच स्थान असेल कारण त्यांची शैली सामना जिंकण्यात नेहमीच हातभार लावते.''