लखनौ - वेस्ट इंडीजने सर्व आघाड्यांवर दमदार कामगिरी करत अफगाणिस्तान विरुध्दच्या एकमात्र कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी विजय मिळवला. लखनौच्या अटल बिहारी एकना मैदानात रंगलेल्या या सामन्यात विडींजने अफगाणिस्तानला ९ गडी राखून धूळ चारली. सामन्यात १० गडी बाद करणाऱ्या विडींजचा 'वजनदार' फिरकीपटू रहकिम कॉर्नवालला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.
अफगाणिस्तानची अवस्था दुसऱ्या दिवसाअखेर ७ बाद १०७ अशी झाली होती. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला अफगाणिस्तानचे तीन गडी ७.१ षटकात ११ धावांची भर घालून परतले. वेस्ट इंडीजला विजयासाठी २१ धावांची गरज होती. हे आव्हान विडींजने एका गड्याच्या मोबदल्यात ६.२ षटकात पूर्ण केले.
तिसऱ्या दिवशी कर्णधार जेसन होल्डरने अफगाणिस्तानचे राहिलेले तीन गडी बाद केले. अफगाणिस्तानने पहिल्या डावात १८७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल विडींजने पहिल्या डावात ब्रुक्सच्या (१११) शतकी खेळीच्या जोरावर २७७ धावा करत ९० धावांची भक्कम आघाडी घेतली होती.
अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली होती. सलामीवीर इब्राहिम आणि जावेद अहेमदी या दोघांनी अर्धशतकी सलामी दिली. इब्राहिम बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानचा डाव कोसळला. दुसऱ्या दिवसाअखेर अफगाणिस्तानचे १०७ धावांवर ७ गडी बाद झाले. जावेद अहमदी याने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला.
हेही वाचा - तेरा ध्यान किधर है..! पाकच्या खेळाडूचे अजब क्षेत्ररक्षण...व्हिडिओ पाहून तुम्हीही हसाल
हेही वाचा - अभिमन्यू मिथुनचे एका षटकात ५ बळी, याआधी बांगलादेशच्या गोलंदाजाने केलाय हा कारनामा!