चेन्नई - ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आज शुक्रवारी मायदेशी परतले आहेत. तामिळनाडू राज्य सरकारच्या नियमानुसार अश्विन आणि सुंदर पुढील दोन दिवस क्वारंटाइन असतील.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत अश्विनने पहिल्या तीन सामन्यांत १२ बळी मिळवले. पण दुखापतीमुळे तो ब्रिस्बेन येथे झालेल्या निर्णायक चौथ्या कसोटीत खेळू शकला नाही. पाठदुखी असूनही सिडनीतील तिसर्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी अश्विनने हमुना विहारीबरोबर ६२ धावांची भागीदारी करून कसोटी बरोबरीत सोडवली.
हेही वाचा - ''आता आयपीएल पूर्वीसारखे असणार नाही'', बुमराहच्या मलिंगाला शुभेच्छा
तर, वॉशिंग्टन सुंदरने चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीविरुद्ध पहिल्या डावात ६२ धावा केल्या. गाबा येथे झालेला हा वॉशिंग्टनचा पदार्पणाचा सामना होता. भारत संकटात असताना त्याने शार्दुल ठाकुरबरोबर १२३ धावांची भागीदारी केली. त्याने या सामन्यात चार बळीही घेतले. भारताने ही कसोटी तीन गडी राखून जिंकली.
चेन्नईमध्ये ५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी अश्विन आणि वॉशिंग्टन यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्यासह भारतीय संघातील इतर अनेक सदस्य गुरुवारी मायदेशी परतले.