नवी दिल्ली - यंदाची आयपीएल स्पर्धा झाली नाही तर, महेंद्रसिंह धोनीसाठी समस्या वाढतील असे भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी म्हटले आहे. 2019 मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर, धोनी भारतीय संघाबाहेर आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेवर धोनीचे भारतीय संघातील भवितव्य अवलंबून होते. मात्र, कोरोनामुळे या स्पर्धेवर टांगती तलवार आहे.
धोनीने विश्वचषकानंतर क्रिकेट सामना खेळलेला नाही. जर आयपीएल झाले नाही तर धोनीसाठी समस्या आणखी वाढतील. टीम मॅनेजमेंट, रवी शास्त्री, विराट कोहली किंवा निवड समिती काय विचार करत आहेत, हे मला माहित नाही'', असे क्रिकेट सल्लागार समितीचे (सीएसी) सदस्य मदन लाल यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले.
"निवड समितीची अशी इच्छा होती की धोनीने क्रिकेट खेळावे आणि मग त्यांनी निवड करावी. टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीची मोठी जबाबदारी आहे. मला असे वाटते की समस्या वाढल्या आहेत. धोनीने बरेच क्रिकेट खेळले आहे आणि तो एक उत्तम कर्णधार होता'', असेही मदनलाल यांनी म्हटले आहे.
तामिळनाडू, महाराष्ट्र, पंजाब, तेलंगाणा आणि ओडिशासारख्या अनेक राज्यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केले असल्याने आयपीएल पुढे ढकलण्याची शक्यता आहे. लाल म्हणाले की कोरोनाव्हायरस संकट संपेपर्यंत आयपीएल आयोजित करणे कठीण आहे.