मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकाची निवड केली आहे. वन-97 कम्युनिकेशन्स प्राइवेट लिमिटेडची मालकी असलेल्या पेटीएमला टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकासाठी निवडले गेले आहे.
बीसीसीआयने पेटीएम संदर्भात आज बुधवारी घोषणा केली. पेटीएमने ३२६.८० कोटी रुपयांची बोली लावून मुख्य प्रायोजकाचा मान पटकावला. पेटीएम आता टीम इंडियाबरोबर चार वर्षांसाठी करारबद्ध झाले आहे. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी या कराराबद्दल माहिती दिली.
जोहरी म्हणाले, 'मला सांगताना आनंद वाटतो आहे की, पेटीएम इथल्या मालिकेसाठी मुख्य प्रायोजक असणार आहे. भारताच्या नवीन पिढीतील कंपनीपैकी पेटीएम एक आहे. आम्हाला गर्व होत आहे की, पेटीएम टीम इंडियासोबत आपला करार कायम राखणार आहे.'
पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर वर्मा म्हणाले, 'आम्ही बीसीसीआय आणि टीम इंडियासोबतच्या भागीदारीमुळे खुष आहोत.'