ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. ब्रिस्बेनच्या मैदानावर आजपासून पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचा पहिला डाव गडगडला. पहिल्या दिवशी पाकिस्तानचा संघ ८६.२ षटकात २४० धावांवर आटोपला.
पाकिस्तानचे सलामीवीर शान मसूद आणि अझहर अली या जोडीने सावध सुरुवात केली. दोघांनी अर्धशतकी भागिदारी रचली. संघाची धावसंख्या ७५ असताना मसूद व्यक्तीगत २७ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार अझहर अली ३९ धावा काढून बाद झाला. ही जोडी बाद झाल्यानंतर पाकिस्तानला गळती लागली. तेव्हा असद शफीफने एकबाजू पकडून डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
स्टॉर्क, हेझलवूड आणि लियॉन यांनी पाकच्या मधल्या फळीला गुंडाळत पाकची ५ बाद ९४ अशी अवस्था केली. तेव्हा शफीकने रिझवान आणि यासिर शाह यांच्यासोबत छोट्या भागिदारी रचून संघाला २०० चा टप्पा ओलांडून दिला. शफीक व्यक्तीगत ७६ धावा काढून बाद झाला. तर मोहम्मद रिजवानने ३७ आणि यासिर शाहने २६ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मिशेल स्टॉर्कने ५२ धावा देत सर्वाधिक ४ गडी बाद केले. पॅट कमिन्सने ३, जोश हेझलवूडने २ आणि नाथन लॉयनने १ गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.
हेही वाचा - डे-नाईट कसोटी: गोलंदाजीत यशस्वी कोण? फिरकीपटू की वेगवान गोलंदाज, असा आहे रेकार्ड
हेही वाचा - IND VS BAN: ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्याची तिकिटं ब्लॅकने विकताना ६ जण अटकेत