लाहोर - रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय क्रिकेट खेळणे म्हणजे प्रथम श्रेणी सामन्यात खेळल्यासारखे आहे, असे पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार बाबर आझमने दिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) अलीकडेच कोरोनानंतर खेळ पुन्हा सुरू करण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. चेंडू चमकण्यासाठी लाळ वापरण्यास आयसीसीने बंदी घातली असून सामने रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय खेळवण्यास सांगितले आहे.
बाबर म्हणाला, "हे खूप कठीण जाईल. प्रेक्षकांमधे कोणी नसल्यास असे वाटेल की आम्ही प्रथम श्रेणी सामना खेळत आहोत. आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपण चेंडू चमकवू शकत नाही. जेव्हा स्टँडमध्ये प्रेक्षक असतात तेव्हा क्रिकेट खेळण्याची मजा येते. पण त्यांच्याशिवाय खूप कठीण जाईल. मुले जेव्हा सामने पाहायला येतात तेव्हा ते या पातळीवर खेळायला प्रवृत्त होतात. या सर्व गोष्टींची आपल्याला आठवण येईल."
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपल्या खेळातील नियमांमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीने (सीईसी) अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखालील क्रिकेट समितीच्या शिफारशींना मान्यता दिली आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण आणि खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. आयसीसीने कसोटी क्रिकेटमध्ये कोरोना घटनेत एका पर्यायी खेळाडूला खेळण्यास मान्यता दिली आहे. मात्र हा नियम टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये लागू होणार नाही.