कराची - पाकिस्तानचे माजी कर्णधार राशिद लतीफ यांनी वयचोरीवरून पाकिस्तान क्रिकट बोर्डावर (पीसीबी) टीका केली आहे. पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वरिष्ठ संघात पदार्पण केले होते. परंतु त्यानंतर त्याचा पुढच्या वर्षीच्या पाकिस्तानच्या अंडर-१९ विश्वचषकासाठीच्या संघात समावेश करण्यात आला.
हेही वाचा - टेटे : मार्कहॅममध्ये विजेतेपद जिंकून मानवने रचला इतिहास
या प्रकरणी लतीफ यांनी आपल्या एका ट्विटमध्ये पीसीबीला स्वतःची चेष्टा करू नका असा सल्ला दिला आहे. 'पाकिस्तानी क्रिकेट संघाचे खेळाडू अंडर -१९ खेळणार आहेत. १९ वर्षांखालील खेळाडू अंडर -१६ खेळणार आहेत. १६ वर्षांखालील खेळाडू १३ वर्षांखाली आणि १३वर्षांखालील खेळाडू परत आईच्या मांडीवर', असे माजी यष्टीरक्षक फलंदाज लतीफ यांनी ट्विटरवर लिहिले आहे.
५१ वर्षीय लतीफ पुढे म्हणाले, 'निदान देवासाठी तरी, पीसीबीने त्यांचे योग्य वय सांगावे. बनावट डिप्लोमाद्वारे डॉक्टरांसोबत काम करून आपली प्रतिष्ठा डागळू नका, किंवा स्वतःची चेष्टा करु नका.' तत्पूर्वी, माजी निवडकर्ता प्रमुख मोहसीन खान यांनीही अंडर-१९ मध्ये खेळण्याच्या नसीमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.