कराची - पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सद्या मोठ्या आर्थिक संकटातून जात असून बोर्डाकडे खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यासाठी देखील पैसे नाहीत. यामुळे खेळाडूंनी स्वखर्चाने चाचणी करुन घ्यावी, असे पीसीबीकडून सांगण्यात आल्याचे सूत्रांची माहिती आहे.
पाकिस्तानच्या रावलपिंडी आणि मुल्तानमध्ये या महिन्याच्या अखेरीस टी-२० चॅम्पियनशीप स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंनी, सामनाधिकाऱ्यांनी, तसेच या स्पर्धेशी संबधित लोकांनी स्वखर्चाने कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे पीसीबीने सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नॅशनल टी-२० चॅम्पियनशीप स्पर्धेला ३० सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू, पंच, सामनाधिकारी यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली. पण, त्याचा खर्च पीसीबी उचलणार नाही. तो खर्च खेळाडूंना त्यांच्या खिशातून करावा लागणार आहे. या स्पर्धेत २४० खेळाडूसह सामनाधिकारी सहभागी होणार आहेत.
दरम्यान, दुसरीकडे बीसीसीआय आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आर्थिक उलाढालीमध्ये वेगवेगळे विक्रम प्रस्थापित आहे. असाच प्रयत्न पाकिस्तान बोर्डाने पाकिस्तान सुपर लीगच्या माध्यमातून केला. पण ते त्यात अपयशी ठरले.
पीएसएलच्या पहिल्या दोन हंगामांमध्ये आर्थिक व्यवहारांमधली अनियमीतता, संघमालकांकडून पैसे गोळा करण्यासाठी झालेला उशीर, पत्रकार-स्थानिक क्रिकेट बोर्डाचे सदस्य यांना देण्यात आलेले भत्ते, यामुळे पाक क्रिकेट बोर्डाला तब्बल २४ कोटी ८६ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. याचसोबत सामन्यांचे प्रक्षेपण करण्यासाठीच्या हक्कांचा लिलाव न केल्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाला मोठा फटका बसला होता.
हेही वाचा - बॉक्सिंग-डे कसोटीत असणार प्रेक्षक?
हेही वाचा - 'या' दिग्गज क्रिकेटपटूंची २०२०ची आयपीएल असणार अखेरची?