कराची - पाकिस्तानचा दिग्गज फिरकीपटू सकलेन मुश्ताकने काही दिवसांपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीची स्तुती केली होती. यूट्यूबवर एका व्हिडिओद्वारे मुश्ताकने धोनीबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. या प्रशंसेमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मुश्ताकला फटकारले आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, पीसीबीने सकलेन मुश्ताकला तो बोर्डाचा कर्मचारी असल्याची आठवण करून दिली आहे. यूट्यूबवर असा व्हिडिओ टाकण्यास मनाई असल्याचे पीसीबीने त्याला कळवले आहे. सकलेन मुश्ताक सध्या पीसीबीच्या 'हाय परफॉरमन्स सेंटर'मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या विकास विभागाचा प्रमुख आहे.
पीसीबी सकलेन मुश्ताकच्या भारतीय क्रिकेटच्या व्यवहारातील हस्तक्षेपाबद्दल आणि धोनीच्या कौतुकाबद्दल खूश नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे. मुश्ताकने अलीकडेच आपल्या यूट्यूब चॅनेलवर धोनीचे कौतुक केले होते. धोनीने निरोपाचा सामना न खेळता निवृत्ती घेतली हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) पराभव असल्याचे मुश्ताकने म्हटले होते.
धोनीने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. २०१९ वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.