कराची - पाकिस्तान संघाने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून पराभव केला. पाकच्या विजयात नौमान अली आणि यासिर शाह चमकले. दोघांनी मिळून ९ विकेट घेतल्या. आफ्रिकेने दिलेले ८८ धावांचे माफक लक्ष्य पाकिस्तानने चौथ्या दिवशीच गाठले आणि दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
पाकिस्तानच्या फिरकीपुढे आफ्रिकेचा दुसरा डाव २४५ धावांत आटोपला. सलामीवीर एडीन मार्करम (७४) आणि ऱ्हासी व्हॅन डर दुसेन (६४) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी १२७ धावांची भागीदारी रचली. ही जोडी बाद झाल्यानंतर आफ्रिकेच्या डावाला गळती लागली आणि आफ्रिकेचा अवस्था १ बाद १७५ धावांवरून ६ बाद १९२ अशी झाली होती. तळाच्या फलंदाजांनी आफ्रिकेला २०० चा टप्पा पार करून दिला.
पाकिस्तानला विजयासाठी ८८ धावांचे माफक लक्ष्य मिळाले. तेव्हा कर्णधार बाबर आझम (३०) आणि अझर अली (नाबाद ३१) यांनी पाकिस्तानसाठी मोलाचे योगदान दिले. पहिल्या डावात शतक झळकावणारा फवाद आलम सामनावीर ठरला. दरम्यान, उभय संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याला ४ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे.
हेही वाचा - भारताचा इंग्लंड दौरा : भारताचे भारतासोबत रंगणार सराव सामने
हेही वाचा - चक्क आयसीसीने उडवली पाकिस्तानच्या क्रिकेटपटूची खिल्ली!