कराची - पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आमिर आता फक्त पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि टी-२० संघातून खेळताना दिसणार आहे. वयाच्या २७ वर्षी आमिरने घेतलेली निवृत्ती सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी आहे. त्याच्या निवृत्तीवर पाकिस्तानचे माजी खेळाडू वसिम अक्रम, शोएब अक्रम आणि रमीझ राजा नाराज आहेत.
वसिम अक्रमने ट्विटरद्वारे आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, 'आमिरचा कसोटीमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय खूप चुकीचा आहे. वयाच्या 27 व्या वर्षी कसोटीतून निवृत्ती घेणे म्हणजे चांगल्या क्रिकेटला मुकण्यासारखेच आहे. कसोटी हाच या क्रिकेटचा आत्मा असून त्यामध्येच खरा आनंद मिळविता येतो. आमिरने आपल्या निर्णयाचा परत विचार करावा'.
पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजा यांनीही निवृत्तीवर मतप्रदर्शन केले आहे. ते म्हणाले, ' आमीरचे वयाच्या 27 व्या वर्षी कसोटीतून निवृत्ती घेणे निराशाजनक आहे. पाकिस्तानसाठी हा निर्णय योग्य नाही. कसोटी संघाला सुधारण्यासाठी विचार करणे चालू आहे. ही वेळ खेळण्याची होती निवृत्ती घेण्याची नव्हे.'
रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणारा शोएब अख्तरही आमिरच्या निवृत्तीबाबत नाराज आहे. त्याने पंतप्रधान इम्रान खानला या निवृत्ती प्रकरणात लक्ष घालायला सांगितले आहे. तो म्हणाला, 'या वयात खेळाडू वेग पकडतात. पुन्हा एकदा पाकिस्तान संघासाठी आमिरला खेळता आले असते. या हलाखीच्या वेळी आमिरची संघाला सर्वात जास्त गरज होती. मी जर निवड समितीमध्ये असतो तर या खेळाडूंना टी-२० क्रिकेट खेळायला दिलेच नसते. अशा वेळी पैसा महत्वाचा असतो पण सध्या पाकिस्तानला आमिरची गरज आहे.'
आमिरने २००९ साली श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ३६ कसोटीत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. यात आमीरने ११९ बळी घेतले. वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्जस्टन कसोटीत ४४ धावांत घेतलेले ६ बळी ही आमिरची कसोटी क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.