लाहोर - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आकीब जावेदने संघातील माजी सहकारी खेळाडू सलीम परवेझवर मॅच फिक्सिंगचा आरोप केला आहे. आकीबने सांगितले, की सलीमने त्याची सट्टेबाजांशी ओळख करून दिली. यासाठी खेळाडूंना महागड्या गाड्या आणि कोट्यवधी रुपयांच्या ऑफरही देण्यात आल्या.
क्रिकेट पाकिस्तानच्या अहवालानुसार आकीबने स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले, "महागड्या गाड्या आणि कोट्यावधी रुपये क्रिकेटपटूंकडे देण्यात आले. मला मॅच फिक्स करण्यासही सांगण्यात आले. मी हे केले नाही तर, माझी कारकीर्द संपेल, असेही मला सांगण्यात आले."
47 वर्षीय आकिबने सांगितले, "सलीम परवेझ नावाच्या माजी क्रिकेटपटूमार्फत मॅच फिक्सिंगच्या ऑफरद्वारे खेळाडूंकडे संपर्क साधला गेला." 1980मध्ये परवेझने वेस्ट इंडिजविरुद्ध पाकिस्तानकडून एकमेव एकदिवसीय सामना खेळला. परवेझचे एप्रिल 2013मध्ये निधन झाले.
आकिब म्हणाला, "मला फिक्सिंगबद्दल कळले तेव्हा, मी एक भूमिका घेतली आणि त्या पाठीशी उभा राहिलो. यामुळे माझी कारकीर्द लवकर संपली, पण मला त्याचा खेद नाही. कारण मी माझ्या मूल्यांवर ठाम विश्वास ठेवला. माझ्या भूमिकेमुळे लोकांनी मला दौर्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्याशी बोलणाऱ्यांनाही फटकारले."
1992मध्ये पाकिस्तानच्या विश्वकरंडक विजेत्या संघाचा सदस्य असलेला आकिब 1998मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाला.