नवी दिल्ली - इंग्लंडचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून मालिकेतील पहिला सामन्यात यजमान न्यूझीलंडने इंग्लंडला एक डाव ६५ धावांनी धूळ चारली. महत्वाची बाब म्हणजे मागील दोन दिवसात ३ संघानी डाव राखून विजय मिळवला आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत कसोटी मालिका खेळवण्यात येत आहेत. यात रविवारी झालेल्या भारत आणि बांगलादेश संघातील सामना भारतीय संघाने १ डाव ४६ धावांनी जिंकला. याच दिवशी दुसरीकडे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा एक डाव ५ धावांनी पराभव केला. आज (सोमवार) न्यूझीलंड संघाने ओव्हल येथील सामन्यात इंग्लंडचा १ डाव ६५ धावांनी पराभव केला.
इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात बेन स्टोक्स (९१), ज्यो डेनली (७४) यांच्या खेळींच्या जोरावर सर्वबाद ३५३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने पहिल्या डावात ६१५ धावांचा डोंगर उभारला. महत्वाची बाब म्हणजे न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. एकवेळ न्यूझीलंडची अवस्था ४ बाद १२७ अशी होती. तेव्हा यष्टीरक्षक फलंदाज बीजे वॉटलिंग (२०५) आणि मिचेल सँटनर (१२६) यांच्या खेळीने न्यूझीलंडने पहिल्या डावात ९ बाद ६१५ धावा केल्या.
इंग्लंडचा दुसरा डाव १९७ धावांवर आटोपला. नील वॅग्नर (५/४४), आणि मिचेल सँटनर (३/५३) यांनी इंग्लंडची फलंदाजी कापून काढली. तर त्यांना टिम साऊदी आणि कॉलिन डे ग्रँडहोम यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत चांगली साथ दिली. पहिल्या डावात द्विशतकी खेळी करणाऱ्या बीजे वॉटलिंगला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हेही वाचा - मराठा अरेबियन्सने डेक्कनला धूळ चारत जिंकली टी-१० स्पर्धा
हेही वाचा - ऐतिहासिक 'गुलाबी' विजयानंतर भारतीय संघाने केलेले विक्रम, वाचा एका क्लिकवर.....