चेन्नई - इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये शुबमन गिल हा चर्चेचा केंद्रबिंदू असेल, असे भाकित व्हीव्हीएस लक्ष्मण याने व्यक्त केले आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला उद्या (ता. ५) पासून चेन्नईत सुरूवात होणार आहे.
एका क्रीडा माध्यमाशी बोलताना लक्ष्मण म्हणाला की, 'इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये शुबमन गिल हा चर्चेचा केंद्रबिंदू असेल. फक्त कसोटीतच नाही तर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये गिलवर सगळ्याची लक्ष असणार आहे.'
'गिलने आयपीएल, भारत अ, प्रथम श्रेणी क्रिकेट किंवा पंजाबकडून खेळताना सातत्याने धावा केल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाच्या हेझलवूड, स्टार्क आणि कमिन्स यांच्यासारख्या मातब्बर गोलंदाजांचा यशस्वी सामना त्याने केला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने आक्रमकता आणि तंत्राचा वापर करून चांगल्या फलंदाजीचे दर्शन घडवले. गिलला त्याच्या प्रतिभेबाबत माहिती आहे, असे देखील लक्ष्मण म्हणाला.
दरम्यान, शुबमन गिलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिका खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने गिलने केले. त्याने पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त झाल्यानंतर भारतीय संघाच्या सलामीची धुरा यशस्वीपणे पेलली. त्याने ५१.९ च्या सरासरीने २५९ धावा केल्या. यात २ अर्धशतकाचा समावेश आहे.
हेही वाचा - IND VS ENG : जो रूट म्हणतो, विराट नव्हे तर 'या' खेळाडूची विकेट आमच्यासाठी महत्वाची
हेही वाचा - Ind vs Eng : पाहुण्या संघाला जबर धक्का; पहिल्या २ कसोटीतून बाहेर पडला सलामीवीर