बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान विरुध्द न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने ६ बळी राखून विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. न्यूझीलंडने दिलेले २३८ धावांचे आव्हान पाकने बाबर आझम (नाबाद १०१ धावा) शतकी खेळी आणि हरिस सोहेलच्या ६८ धावांच्या मतदीने पूर्ण केले.
२३८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात चांगली नाही. सलामीवीर फखर झमान संघाच्या १९ धावा झाल्या असताना बाद झाला. त्यानंतर पुन्हा इमाम उल हक दहाव्या षटकात संघाची धावसंख्या ४४ असताना बाद झाला. यानंतर मात्र, मोहम्मद हाफिज आणि बाबर आझम याने संघाची परझड रोखली. मोहम्मद हाफिज वैयक्तिक ३२ धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हरिस सोहेल आणि बाबर आझम या दोघांनी भागिदारी रचत पाकच्या विजयाचा मार्ग सुकर केला. विजयाची औपचारिकता बाकी असताना हरिस सोहेल ६८ धावांवर धावबाद झाला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी २३८ धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पाक गोलंदाजांनी धारदार मारा करत न्यूझीलंडला कमी धावांमध्ये रोखण्यात यश मिळवले. पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ३ गडी बाद केले.
न्यूझीलंडकडून जेम्स नीशामने सर्वाधिक ९७ धावा केल्या. तर कॉलिन डी ग्रँडहोमने ६४ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी १८३ धावांची भागीदारी करत न्यूझीलंडची धावसंख्या दोनशेपार नेली. स्पर्धेत पाकने आतापर्यंत ७ सामने खेळले असून पाकिस्तानने ३ विजयासह ७ गुण जमा केले आहेत.