वेलिंग्टन - आयसीसीने नियम २.२२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय संघाला दंड ठोठावला आहे. आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी विराट कोहलीसह संपूर्ण संघाला ४० टक्के दंड केला.
भारत आणि न्यूझीलंड संघात चौथा टी-२० सामना वेलिंग्टनच्या मैदानात खेळवण्यात आला. भारतीय संघाने या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये शानदार विजय मिळवला. भारताचा सुपर ओव्हरमधील हा सलग दुसरा विजय ठरला. या विजयासह भारताने ५ सामन्याच्या टी-२० मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली. या विजयानंतर आयसीसीने भारतीय संघाला दंड केला आहे.
भारतीय संघाला कशामुळे झाला दंड -
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धीम्या गतीने गोलंदाजी केली. भारतीय संघ नियमित वेळपेक्षा दोन षटके मागे होता. यामुळे हा दंड करण्यात आला.
काय आहे आयसीसीचा नियम २.२२ -
आयसीसीचा नियम २.२२ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धीम्या गतीने गोलंदाजी करण्यासंदर्भातील आहे. या नियमानुसार प्रत्येक षटकामागे खेळाडूंच्या मानधनातून २० टक्के रक्कम दंड म्हणून आकारला जातो.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपली चूक मान्य केली आहे. यामुळे या प्रकरणाची सुनावणी करण्याची गरज पडली नाही. दरम्यान, भारत-न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा सामना उद्या (रविवारी) होणार आहे.
हेही वाचा - खेळाडूंचा भन्नाट डान्स, पण टोपी घातलेला चौथा कोण? व्हिडिओ पाहा अन् ओळखा
हेही वाचा - महाराष्ट्राची 'सुलक्षणा' BCCI मध्ये, बजावणार 'ही' महत्वपूर्ण भूमिका