वेलिंग्टन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामना अनिर्णयीत राहिल्याने सुपर ओव्हरच्या निकषानुसार इंग्लंडला विजयी घोषीत करण्यात आले आणि न्यूझीलंडचा पराभव झाला. या पराभवाच्या नैराश्यातून सावरण्याचा प्रयत्न न्यूझीलंडचा संघ करत आहे. दरम्यान, या पराभवानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पहिली प्रतिक्रिया दिली. तो म्हणतो, 'अंतिम सामना कुणीही हरलेला नाही'.
शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला भाग पडलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा सुपर ओव्हरच्या नियमानुसार पराभव केला. मात्र या पराभवानंतर जगभरात आयसीसीच्या नियमावर टीका झाली. तरीही न्यूझीलंडला पराभव सहन करावा लागला. यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली. यामुळे जिमी निशमने तर मुलांना बेकरीत काम करा, पण खेळ खेळू नका असा भावून संदेश दिला. दरम्यान, न्यूझीलंडच्या पराभवानंतर 'कूल' कर्णधार केन विल्यमसनने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. 'शेवटी कोणताच संघ अंतिम सामना जिंकला नाही, पण ट्रॉफी कोणत्याही एका संघाला द्यायचीच आहे' असे तो म्हणाला.
केनने अपयश स्वीकारल्यामुळे सगळीकडे त्यांची आणि त्यांच्या टीमची प्रशंसा होत आहे. तसेच त्यांनी सांगितले की स्पर्धेच्या नियमांबद्दल सगळ्यांना आधीच माहित होते. दोन्ही संघानी खूप मेहनत घेतली होती. दोन प्रयत्नानंतरही विजेता ठरत नव्हता, यानंतर जे काही झाले, ते असे व्हायला नको होते, असेच सर्वांना वाटले, असेल असे तो म्हणाला.