नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनंतर बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुश्फिकुर रहिमने आगामी आयपीएल हंगामाच्या लिलावातून माघार घेतली आहे. कोलकाता येथे १९ डिसेंबरला आयपीएलचा लिलाव पार पडणार असून या लिलावाआधी रहिमने माघार घेतली.
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या मोसमासाठी एकूण ९७१ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक निवेदनाद्वारे या विषयी माहिती दिली. नोंदणीची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०१९ होती. आता या महिन्याच्या १९ तारखेला कोलकातामध्ये लिलाव होणार आहे.
आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या अशा एकूण १९ भारतीय खेळाडूंनी नोंदणी केली आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेल्या अशा ६३४ अशा भारतीय खेळाडूचाही लिलाव होणार आहे. यात ६० खेळाडू असे आहेत ज्यांना आयपीएलचा अनुभव आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या १९६ विदेशी खेळाडूंनी आयपीएलच्या आगामी हंगामासाठी नोंदणी केली आहे. त्याचबरोबर असे ६० परदेशी खेळाडू आहेत जे आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप खेळलेले नाहीत. या लिलावासाठी ऑस्ट्रेलियाचे ५५, दक्षिण आफ्रिकेचे ५४, श्रीलंकाचे ३९, न्यूझीलंडचे २४, इंग्लंडचे २२, वेस्ट इंडीजचे ३४, अफगाणिस्तानचे १९, बांग्लादेशचे ६, झिम्बाब्वेचे ३, नेदरलँड्स व अमेरिकेचा प्रत्येकी एक इत्यादी खेळाडूंनी नोंदणी केली आहे.
आयपीएलच्या या लिलावातून मुश्फिकुरने आपले नाव मागे घेतले आहे. दरम्यान, नुकत्याच भारताविरुद्ध पार पडलेल्या मालिकेत मुश्फिकुरने चांगली कामगिरी केली होती. पण चांगल्या फॉर्मात असतानाही, मुश्फिकुरने लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
मुश्फिकुरने लिलावाच्या प्रक्रियेतून माघार घेतली असली, तरीही बांगलादेशचे मेहमद्दुल्लाह, मेहदी हसन मिर्झा, मुस्तफिजूर रेहमान, सौम्या सरकार, तमिम इक्बाल आणि तस्कीन अहमद हे खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत.
हेही वाचा - धोनी के आवाज में पेश है, जब कोई बात बिगड जाए...व्हिडिओ मात्र स्वतःच्या रिस्कवर पाहा
हेही वाचा - माझा हेतू हार्दिकची जागा घेणे नसून फक्त देशासाठी खेळणे आहे - शिवम दुबे