चेन्नई - इंडियन प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जवर ४६ धावांनी दणदणीत विजय साजरा केला. या विजयामुळे मुंबईला आयपीएलच्या गुणतालिकेत एका स्थानाचा फायदा झाला असून मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला मागे सारत दुसरे स्थान पटकावले आहे.
चेन्नई सुपरकिंग्सला या मोसमात मुंबईने दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का दिला आहे. मात्र असे असले तरीही चेन्नईने १६ गुणांसह गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तर कालच्या विजयामुळे मुंबईच्या संघाला २ गुणांचा फायदा झाला असून ते १४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आले आहेत.
मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघाच्या खात्यात १४ गुण जमा आहेत, मात्र मुंबईचा संघ रनरेटमध्ये सरस ठरल्याने दिल्लीच्या संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. तर हैदराबाद आणि पंजाबचा संघ १० गुणासंह अनुक्रने चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहे. उरलेल्या ३ संघामध्ये ८ गुणासंह कोलकाता सहाव्या, राजस्थान सातव्या आणि बंगळुरू आठव्या क्रमांकावर आहे.