कार्डिफ - बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारताने ३५९ धावांचा डोंगर उभा केला होता. लोकेश राहुलने १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०८ धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या धोनीने ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ११३ धावा करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली.
या सामन्यात भारताची फलंदाजी सुरु असताना एक मजेदार गोष्ट पाहायला मिळाली. धोनी स्ट्राईकवर होता आणि बांगलादेशच्या शब्बीर रेहमानचे षटक सुरु होते. त्यावेळी एक क्षेत्ररक्षक आपली जागा सोडून चुकीच्या जागी उभा होता. हे धोनीला लक्षात आल्यानंतर त्याने सामना मध्येच थांबवला आणि शब्बीरला त्या क्षेत्ररक्षकाची जागा बदलण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शब्बीरनेही लगेच क्षेत्ररक्षकाला त्या जागेवर जाण्यास सांगितले.