मुंबई - महेंद्रसिंह धोनीसाठी आयपीएल स्पर्धा खूपच महत्त्वाची मानली जात आहे. कारण धोनीचे आंतरराष्ट्रीय कारकीर्द आता आयपीएलच्या कामगिरीवर अवलंबून आहे. पण, आयपीएलच्या १३ हंगामावर कोरोना विषाणूच्या फैलावामुळे अनिश्चिततेचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन आता अशक्य आहे, असे मत भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे.
सेहवाग याविषयी म्हणाला, की 'निवड समिती जेव्हा एका खेळाडूला सोडून पुढे जाते. तेव्हा त्याच्या नावाचा विचार ते पुन्हा करताना दिसत नाही. धोनीने जरी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर धोनीला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण आता टी-२० क्रिकेटमध्ये केएल राहुल आणि ऋषभ पंत हे दोघे यष्टीरक्षण करताना दिसत आहेत. त्यामुळे निवड समिती ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकासाठी राहुल आणि पंत यांच्या नावाला पसंती देऊ शकते.'
राहुल आणि पंत यांना बाजूला सारुन निवड समिती विश्वकरंडकासाठी धोनीच्या नावाचा विचार करेल, असे मला वाटत नाही. यामुळे धोनीचे भारतीय संघातील पुनरागमन अशक्य आहे, असेही सेहवाग म्हणाला.
याआधी आयपीएलवर धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भवितव्य अवलंबून आहे, असे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही म्हटले होते. पण आता आयपीएल पुढे ढकलल्यावर धोनीचे काय होणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
दरम्यान, धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडकानंतर क्रिकेटपासून लांब आहे. पण तो आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सराव सत्रात सहभागी झाला होता. कोरोनाच्या धोक्यामुळे चेन्नई संघाच्या व्यवस्थापनाने सराव सत्रही रद्द केला.
हेही वाचा - VIDEO : प्रात्यक्षिकाद्वारे सचिनने सांगितला कोरोनावरचा उपाय
हेही वाचा - कोरोनाबाधित अॅलेक्स हेल्समुळे PSL स्थगित?, स्वत: पोस्ट शेअर करत दिली माहिती अन्...